दिल्लीपोलिसांच्या विशेष टीमने गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला जीटीबी एनक्लेव्हमध्ये तृतीयपंथी एकता जोशी (Ekta joshi) गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी दोन कुख्यात गुंड गगन पंडीत आणि वरुणला ताब्यात घेतले आहे. एकताची हत्या का करण्यात आली, याचे कारण पोलिसांनी या आरोपींना विचारले असता ते ऐकून पोलिसही दंग झाले आहेत. (Delhi Police arrested 2 gangster in Ekta joshi murder Case.)
55 लाखांची सुपारी देऊन या गुंडांकरवी एकताची हत्या करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी या गुंडांवर एक लाख आणि पन्नास हजाराचा इनाम ठेवला होता. हे दोघेही फरार होते. एकता हत्येच्या दिवशी स्कूटरवरून जात होती. एकताची सावत्र आई अनिता जोशी आणि सावत्र भाऊ आशिष जोशी यांच्यासोबत एका कारमधून ते आले होते. गोळी लागल्याने एकताचा मृत्यू झाला होता.
पोलिसांना हे दोघे गुंड एका ठिकाणी येणार असल्याची टीप मिळाली होती. पोलिसांनी त्यांना घेरताच त्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्यूत्तरात त्यांना पकडण्यात आले. एकताचा खून तिचा प्रतिस्पर्धी असलेला आणखी एक तृतीयपंथी मंजूर इलाहीने केला होता. त्यानेच या गुंडांना 55 लाख रुपयांची सुपारी दिली होती. यामध्ये एकताची सावत्र आई आणि भाऊदेखील सहभागी होते.
दोन तृतीयपंथी टोळ्यांमध्ये एरियाच्या हद्दीवरून वाद होता. यामुळे तृतीयपंथी सोनम, वर्षा आणि कमल, मंजूर यांनी एकताचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली होती. ठरलेल्या रकमेचे 15 लाख मिळाल्यानंतर एकताची हत्या करण्यात आली होती. 55 लाख रुपये तीन टप्प्यांत देण्याचे ठरले होते. गगनकडून पोलिसांनी एक पिस्तुल, चार काडतुसे आणि वरुणकडून एक कट्टा आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याचबरोबर पोलिसांनी त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ जप्त केली आहे.