अकोला: शहरातील इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांची आर्थिक वादातून निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांपैकी माजी नगरसेवक रणजितसिंह चुंगडे व पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी यांना दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्यांचे दोन साथीदार रूपेशसिंह चंदेल, राजू मेहरे यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. अशी माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी सायंकाळी विश्रामगृहावर दिली.किशोर खत्री व रणजितसिंह चुंगडे यांच्या बालाजी मॉलसह इतर आर्थिक कारणांवरून वाद झाले. घटनेच्या दिवशी ३ नोव्हेंबर २०१५ रोजी दोघेही मॉलमध्ये होते. येथूनच आरोपी रणजितसिंह चुंगडे याने किशोर खत्री यांना कारमध्ये बसवून सोमठाणा शेतशिवारात नेले. या ठिकाणी रणजितसिंह चुंगडे, पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, रूपेशसिंह चंदेल आणि राजू मेहरे यांनी किशोर खत्री यांच्यावर गोळी झाडून व धारदार कत्त्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने हत्याकांडाशी संबंधित एकूण २१ साक्षीदार तपासले. रणजितसिंह चुंगडे आणि पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्यामुळे त्यांनीच किशोर खत्री यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले; परंतु रूपेशसिंह चंदेल, राजू मेहरे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. चुंगडे व जस्सी यांना न्यायालयाने भादंवि कलम ३0२(३४) व १२0 ब मध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ४0 हजार रुपये मृतक किशोर खत्री यांची पत्नी शोभा खत्री यांना आणि उर्वरित १0 हजार रुपये शासन जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला, अशी माहितीही विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली. यावेळी जिल्हा सरकारी विधिज्ञ गिरीश देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूपबहुचर्चित हत्याकांडाचा निकाल आणि रणजितसिंह चुंगडे याची गुन्हेगारी पृष्ठभूमी पाहता, गुरुवारी न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त न्यायालय परिसरात तैनात केला होता.निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दीकिशोर खत्री हत्याकांडाचा अंतिम निकाल ऐकण्यासाठी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयात विधिज्ञ, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सरकारी पक्षाची बाजू प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी विधिज्ञ गिरीश देशपांडे यांनी मांडली. न्यायालयाच्या परिसरातसुद्धा नागरिकांसह खत्री यांचे कुटुंबीय, रणजितसिंह चुंगडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालाविषयी प्रत्येकाला उत्सुकता होती.खत्री कुटुंबातर्फे निकम यांचा सत्कारअॅड. उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळाली. त्यामुळे खत्री कुटुंबाच्यावतीने अॅड. निकम यांचा शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी निकम यांना दिलीप खत्री यांनी पेढे भरविले.