चापोली : चाकूर तालुक्यातील चापोली येथे मागील भांडणाची कुरापत काढून दोन विद्यार्थ्यांना सहा जणांनी मारहाण करीत चाकू हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, चापोली येथील एका महाविद्यालयातील वर्गात शनिवारी दुपारी फिर्यादी बालाजी तुकाराम श्रीमंगले (१८) व साक्षीदार राम कोरे (दोघेही रा. अजंनसोंडा, बु.) हे १२ वीची परीक्षा देऊन बोलत बसले होते. तेव्हा आरोपी नामदेव गोरखनाथ बोईनवाड याच्यासह अन्य काहीजण गैरकायद्याने एकत्र येऊन वर्गात प्रवेश केला. सहा महिन्यांपूर्वी माझे व माझ्या मित्राचे नाव सांगून गावातील लोकांकडून मार खाऊ घातला, असे म्हणत मागील भांडणाची कुरापत काढली. दरम्यान, बालाजी श्रीमंगले यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा राम कोरे हा भांडण सोडवित असताना नामदेव बोईनवाड याने श्रीमंगलेचे पोट, हात, दंड, मनगटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी श्रीमंगले व कोरे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. कोरे हा भांडण सोडवित असताना त्याच्यावरही चाकूने वार करून जखमी करण्यात आले.
याबाबत बालाजी श्रीमंगले यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात आरोपी नामदेव गोरखनाथ बोईनवाड, विशाल अशोक पवार व अन्य चार अल्पवयीनवर (सर्व रा. चापोली) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. सूर्यवंशी, पोहेकॉ. परमेश्वर राख हे करीत आहेत. गंभीर जखमी असलेल्या बालाजी बोईनवाडवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.