जालना : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या कानावर पिस्तूल ताणले. त्यानंतर, चाकूने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना जालना शहरातील मंठा बायपासजवळ रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली. वीरेंद्र धोका असे जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.
वीरेंद्र धोका यांचा एका व्यक्तीसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू आहे. रविवारी सायंकाळी धोका हे जालना शहरातील मंठा बायपासजवळील शिशुग्रह येथे होते. त्याच वेळी संशयित तेथे आला. त्यांच्यात वादावादी झाली. संशयिताने धोका यांच्या कानावर पिस्तूल ताणली. गोळीबार करण्याच्या तयारीत असतानाच, धोका हे बाजूला सरकले. त्यावेळी चार गोळ्या या जमिनीवर पडल्या. नंतर संशयिताने चाकू काढून धोका यांच्या पोटासह चेहऱ्यावर वार केले. त्यात धोका हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली. सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्यानंतर, खासगी रुग्णालयात जाऊन धोका यांचा जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली. घटनास्थळाला डीवायएसपी सचिन सांगळे यांनी भेट दिली.