जेसिका लाल हत्याकांड (१९९९) एका उच्चभ्रू पार्टीमध्ये बार टेंडरचे काम करणारी मॉडेल जेसिका लाल हिच्या हत्येनेदेखील देशात खळबळ उडाली होती. मेहेरौली येथील एका उच्चभ्रू क्लबमध्ये रात्री दोन वाजता एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा मुलगा मनू शर्मा याने तिच्याकडे आणखी दारू देण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यानंतर त्याने खिशातून पिस्तूल काढून एक गोळी हवेत आणि दुसरी थेट तिच्या डोक्यात मारली होती. या हत्येनंतर देशभरात कल्लोळ झाला आणि नंतर मनू शर्माला अटक करण्यात आली.
२० महिलांची हत्या करणारा सायनाइड मोहन (२००४) -दक्षिण कर्नाटकमधील एका प्राथमिक शाळेतील शिक्षक मोहन कुमार याने २००४ ते २००९ मध्ये २० महिलांशी लगट वाढवीत त्यांना लग्नाचे आमिष दिले. तसेच त्यांच्याशी संबंध ठेवले. या संबंधांनंतर गर्भनिरोधक गोळी देतो असे सांगून त्याने महिलांना सायनाइडच्या गोळ्या देत त्यांचा जीव घेतला. तसेच, त्या महिलांचे दागिने, पैसे घेऊन पोबारा केला. त्याने सायनाइड देऊन हत्या केल्यामुळेच त्याचे नाव ‘सायनाइड मोहन’ असे पडले होते.
निठारी हत्याकांड (२००६) -२९ डिसेंबर २००६ रोजी निठारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका घराच्या मागील बाजूस नाल्यात मुलांच्या मृतदेहाचे अवशेष दोन लोकांनी पाहिले आणि येथून वाचा फुटली एका मोठ्या हत्याकांडाच्या प्रकरणाला. मोनिंदर सिंग पंधेर आणि सुरिंदर कोहली यांनी काही लहान मुला-मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांच्या तपासात एकूण १९ मानवी कवट्या आणि शरीराचे कुजलेले अवयव सापडले होते.
आरुषी हत्याकांड (२००८) -दिल्लीत प्रख्यात डॉक्टर दाम्पत्य तलवार यांची १४ वर्षीय मुलगी आरुषी हिचा गळा चिरून हत्या केलेला मृतदेह तिच्या बेडरूमध्ये आढळून आला होता. तलवार यांच्या घरातील नोकर हेमराज याने तिची हत्या केल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय होता; पण तलवार यांच्या बंगल्याच्या गच्चीत ज्या पद्धतीने आरुषीला मारले, त्याच पद्धतीने गळा चिरून हेमराजचीदेखील हत्या झाल्याचे आढळून आले. एखाद्या निष्णात शल्यचिकित्सकाने शस्त्रक्रिया करताना ज्या पद्धतीने शरीराला कट्स द्यावेत तसेच कट या दोघांच्या गळ्याभोवती दिसून आले होते. त्यामुळे ही हत्या ओळखीच्यांपैकीच कुणी केल्याचे बोलले गेले.निर्भया बलात्कार आणि हत्या (२०१२) -दिल्लीत एका चालत्या बसमध्ये झालेला सामूहिक बलात्कार, तिच्यावर जीवघेणा हल्ला अन् नंतर यातच तिचा मृत्यू, या घटनेमुळे देश हादरला होता. १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री आपल्या मित्रासोबत बसमधून घरी जाणाऱ्या एका मुलीवर बसचालक आणि त्याच्या साथीदाराने चालत्या बसमध्येच बलात्कार केला. हा बलात्कार करतानाच ‘निर्भया’ला प्रचंड मारहाण करीत अतिशय क्रूर पद्धतीने तिच्या शरीराला जखमी केले गेले. यानंतर तिला आणि तिच्या मित्राला नग्न करून रस्त्यात फेकून दिले होते. यानंतर उपचारादम्यान ‘निर्भया’चा मृत्यू झाला.
मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण... -चार वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. २०१८ मध्ये माझी मुलगी श्रद्धा ही मालाड येथील कॉल सेंटरमध्ये रुजू झाली. तिथेच आफताबसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. २०१९ मध्ये तिने पत्नीला दोघांच्या नात्याबाबत सांगून त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असल्याचे सांगितले. मात्र, आम्ही विरोध केला. तेव्हा, मी २५ वर्षांची झाली असून मला माझे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असल्याचे सांगून ती निघून गेली. मी तिला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने ऐकले नाही. ती आईच्या संपर्कात होती. तेव्हा, आफताब तिला मारहाण करत असल्याचे समजले. तिच्या मित्रांकडूनही याबाबत समजताच आम्हाला आणखीनच धक्का बसला. पत्नीच्या निधनानंतर माझेही तिच्याशी बोलणे झाले. तेव्हा, आफताबकडून मारहाण होत असल्याचे समजताच तिला घरी येण्यास सांगितले हाेते. - विकास वालकर, (पाेलिसांना दिलेले स्टेटमेंट)