मुंबई - विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे लागलेला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा आणखी घट्ट होत आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांचे निकटवर्तीय व माजी आमदार नितीन सरदेसाई हे ही ईडीच्या रडारवर आले असून गुरूवारी त्यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. कोहिनूर मिल कर्ज अनियमितता प्रकरणी तसेच राज यांच्याशी असलेल्या भागीदारीतील व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा बोलाविण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दादर पश्चिमेकडील शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या चार जागेत उभारल्याजाणाºया कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे(आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची २२ ऑगस्टला तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची चार दिवस कार्यालयात पाचारण करुन सरासरी ६ ते ८ तास विचारणा केली होती. याप्रकरणी ईडीने राज यांच्यासह तिघांना क्लिन चिट दिलेली नाही. अद्याप चौकशी पुर्ण झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच अनुषंगाने राज यांचे निकटवर्तिय व बांधकाम व्यवसायिक सरदेसाई यांना कार्यालयात हजर रहाण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ते कार्यालयात हजर झाले. जवळपास सात तास त्यांची चौकशी चालली. राज यांच्याशी आर्थिक भागीदारी, कोहिनूर मिल कर्ज प्रकरण आदीबाबत त्यांच्याकडे तपशिलवार माहिती मागविण्यात आल्याचे सांगितले.