कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या आईने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याची आई म्हणाली की, "मी त्याच्याशी अधिक कठोर वागले असते तर ही घटना टाळता आली असती. जर मी जास्त कडक झाले असते तर हे घडलं नसतं."
ती पुढे म्हणाली की, "त्याचे वडील खूप कडक होते, माझ्या पतीच्या मृत्यूनंतर सर्व काही बिघडत गेलं आहे. माझं सुंदर कुटुंब आता फक्त एक आठवण म्हणून राहिलं आहे. मला माहीत नाही की त्याला हे करण्यासाठी कोणी प्रभावित केलं. जर कोणी त्याला यामध्ये अडकवलं असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल."
संजय रॉयच्या आईने सांगितलं की "आपला मुलगा शाळेत टॉपर होता आणि नॅशनल कॅडेट कोरचा भाग होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यासाठी जेवणही बनवायचा. तुम्ही शेजाऱ्यांनाही विचारू शकता, त्याने कधीही कोणाशीही गैरवर्तन केलं नाही. जर मी त्याला भेटले तर विचारेन, 'बाबू, तू असं का केलंस?' माझा मुलगा असा कधीच नव्हता."
"संजयची बायको खूप चांगली होती"
पहिल्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलाला दारूचं व्यसन लागलं. संजयची पहिली बायको खूप चांगली मुलगी होती. ते दोघे आनंदी होते. अचानक तिला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पत्नीच्या मृत्यूनंतर तो नैराश्यात गेला आणि दारू प्यायला लागला असण्याची शक्यता आहे असंही आईने सांगितलं.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या एका दिवसानंतर संजय रॉयला अटक करण्यात आली. गुन्हा झाला त्या दिवशी तो इमारतीत शिरताना दिसला आणि त्याचे ब्लूटूथ हेडफोन सापडले. संजय रॉयच्या मोबाईलमध्ये अनेक हिंसक अश्लील व्हिडिओही आढळून आल्या आहेत.