कोलकाता येथील रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीबीआयने या घटनेत फक्त संजय रॉय नावाच्याच आरोपीचा सहभाग असल्याचं म्हटलं आहे. महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र तपास यंत्रणेने आता हा दावा फेटाळून लावला आहे.
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की केंद्रीय अन्वेषण ब्युरोने सामूहिक बलात्काराची शक्यता नाकारली आहे. कारण उपलब्ध पुरावे सूचित करतात की, फक्त संजय रॉय (ज्याला पोलिसांनी अटक केली आहे) आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येत सामील होता.
सीबीआयचा तपास झाला पूर्ण
सीबीआयचा तपास अंतिम टप्प्यात असून एजन्सी लवकरच चार्जशीट दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी सीबीआयने १०० हून अधिक जबाब नोंदवले असून १० संशयितांच्या पॉलीग्राफ टेस्ट घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलं. यामध्ये रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्या नावाचाही समावेश आहे. सीबीआयकडे पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा कोणताही पुरावा नाही.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ला अशी काही कागदपत्रे मिळाली आहेत, ज्यावरून असं दिसून येतं की आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह मिळाल्याच्या एका दिवसानंतर राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) गुन्हा घडलेल्या जागेच्या आजूबाजूच्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
९ ऑगस्टला सकाळी रुग्णालयातील सेमिनार रूममध्ये ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला. घोष यांनी सेमिनार हॉलला लागून असलेल्या एका खोलीत आणि शौचालयाच्या दुरुस्तीसाठी राज्य पीडब्ल्यूडीला पत्र दिलं होतं. याच ठिकाणी गुन्हा घडला होता. या घटनेने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.