कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणात संजय रॉय हा मुख्य आरोपी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याच्या बहिणीने काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, "मी १७ वर्षांपासून त्याच्याशी बोलले नाही, भेटले नाही. अनेक वर्षे त्याला पाहिलं नाही, त्यामुळे काही सांगता येत नाही. माझ्या लग्नासाठी वडील तयार नव्हते. जर हे लग्न झालं तर आपला कोणताही संबंध राहणार नाही, असं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे कोणतंही नातं नव्हतं."
"जेव्हा तो लहान होता तेव्हा तो सामान्य मुलासारखा होते. आता १७ वर्षे झाली आहेत, त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही. मी त्याला गेल्या काही वर्षांत कधीच पाहिलं नाही... मारामारी वगैरे काही ऐकलं नाही. त्याने असं काही केलं की नाही हे मलाही माहीत नाही. पण त्याने असं काही केलं असेल तर संविधानाने जी काही शिक्षा दिली आहे ती मान्य आहे. जर त्याने हे केलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे" असं संजयच्या बहिणीने म्हटलं आहे.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. घटनेच्या एका दिवसानंतर याप्रकरणी आरोपी संजय रॉय याला अटक करण्यात आली होती. याच दरम्यान, कोलकाता विशेष न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या पॉलीग्राफी टेस्टला परवानगी दिली. डॉक्टरच्या मृतदेहाजवळ सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लूटूथ सापडल्यानंतर रॉयला अटक करण्यात आली.
"मी त्याला भेटले तर विचारेन..."; कोलकाता प्रकरणातील आरोपी संजयच्या आईचं मोठं विधान
संजय रॉयच्या आईने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याची आई म्हणाली की, "मी त्याच्याशी अधिक कठोर वागले असते तर ही घटना टाळता आली असती. जर मी जास्त कडक झाले असते तर हे घडलं नसतं. आपला मुलगा शाळेत टॉपर होता आणि नॅशनल कॅडेट कोरचा भाग होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यासाठी जेवणही बनवायचा. तुम्ही शेजाऱ्यांनाही विचारू शकता, त्याने कधीही कोणाशीही गैरवर्तन केलं नाही. जर मी त्याला भेटले तर विचारेन, 'बाबू, तू असं का केलंस?' माझा मुलगा असा कधीच नव्हता."