कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने पहिल्यांदाच कोर्टात कॅमेऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगितलं. तसेच त्याने हा गुन्हा केलेला नाही आणि त्याला यामध्ये अडकवण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे.
मुख्य आरोपी संजय रॉय याने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, "मी बलात्कार आणि हत्या केलेली नाही. मी निर्दोष आहे. मला फसवण्यात आलं आहे. सरकारने मला फसवलं आहे. त्यांनी मला गप्प राहण्याची धमकी दिली आहे. माझ्या विभागाने (कोलकाता पोलिसांनी) मला धमकी दिली आहे." ११ नोव्हेंबरपासून कोर्ट आता या प्रकरणाची दररोज सुनावणी सुरू करणार आहे.
सीबीआयने आपल्या आरोपपत्रात संजय रॉयला गुन्हेगार ठरवलं आहे. यासोबतच हा सामूहिक बलात्कार नसल्याचं देखील सांगितलं. संजय रॉयनेच हा गुन्हा केला आहे. सीबीआयने दावा केला आहे की, सीएफएसएल रिपोर्टमध्ये वीर्य हे संजय रॉयचं असल्याची पुष्टी झाली आहे. अनेक परिस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्सच्या आधारे त्यानेच गुन्हा केल्याचे सिद्ध होत आहे. या घटनेच्या २४ तासांत कोलकाता पोलिसांनी संजयला अटक केली.
आरोपपत्रात ९ ऑगस्ट रोजी घटनास्थळावरून सापडलेले छोटे केस फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये हे केस संजय रॉयचे असल्याचं म्हटलं आहे. जवळपास १०० साक्षीदार, १२ पॉलीग्राफ टेस्ट, सीसीटीव्ही कॅमेरे, फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन, ब्लूटूथ आणि इतर माहिती यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ट्रेनी डॉक्टरची हत्या संजय रॉय यानेच केली होती. यामागे अन्य कोणाचंही षडयंत्र नव्हतं. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार हे प्रकरण सोडवण्यासाठी अनेक सर्वात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. सेमिनार रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मोठा पुरावा मिळाला. यामध्ये संजय रॉय ९ ऑगस्टला पहाटे ४ वाजता सेमिनार हॉलमध्ये जाताना दिसत आहेत. अर्ध्या तासानंतर तो बाहेर पडतो. यावेळी संजय व्यतिरिक्त कोणीही सेमिनार हॉलमधून बाहेर पडले नाही. सेमिनार हॉलमध्ये त्याचं ब्लूटूथ सापडलं.
फॉरेन्सिक रिपोर्टमधून अनेक गोष्टी समोर आल्या. ट्रेनी डॉक्टरच्या नखांमध्ये सापडलेल्या रक्ताशी संजयचा डीएनए जुळला. आरोपपत्रानुसार, संजय घटनेच्या रात्री खूप दारू प्यायला होता. त्याच नशेच्या अवस्थेत तो रात्री चार वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपली होती. यानंतर तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. संजयने बलात्कार करून तिची हत्या केली.