कोलकाता - गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर एका युवकानं खुन्नस काढण्यासाठी असं काही कांड केला ज्यानं एक्स गर्लफ्रेंडचं जगणं मुश्किल झालं. महागडं गिफ्ट देत नाही म्हणून युवतीने बॉयफ्रेंडशी नाते तोडले. त्यानंतर प्रेमात विश्वासघात मिळालेल्या बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडच्या घरी कॅश ऑन डिलिवरीचे ऑर्डर तिच्या घरी पाठवणे सुरू केले. ४ महिन्यात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून तिच्या घरी ३०० हून जास्त ऑर्डर आल्या. प्रत्येकवेळी गर्लफ्रेंड ती ऑर्डर रिटर्न करत राहिली. अखेर या दोघांनाही ई कॉमर्स कंपन्यांनी ब्लॅकलिस्ट केले. एक्स बॉयफ्रेंडच्या या कारनाम्याला कंटाळून युवतीने पोलीस तक्रार दिली आहे.
नोव्हेंबरपासून सुरू झाली पार्सल पाठवण्याची मालिका
कोलकाताच्या एका नॅशनल बँकेच्या लेक टाऊन ब्रांचमध्ये काम करणारी युवती नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या युवकासोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही महिन्यापूर्वी या दोघांमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर एक्स बॉयफ्रेंडने तिला धडा शिकवण्यासाठी अजब युक्ती लढवली. मागील नोव्हेंबर महिन्यापासून ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या माध्यमातून युवतीच्या घरी त्याने महागडे पार्सल पाठवले. प्रत्येक ऑर्डर ही कॅश ऑन डिलिवरी होती. ज्यामुळे सातत्याने युवतीला ते रिटर्न करावे लागत होते. युवकाने जवळपास ३०० हून अधिक COD ऑर्डर तिच्या घरी पाठवल्याचे तपासात पुढे आले.
महागडे गिफ्ट हवे होते, म्हणून...
युवतीने पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात युवतीच्या घरी ऑर्डर पाठवणारा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमन सिकदर असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी केली तेव्हा अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारला. सुमन युवतीसोबत बदला घेण्यासाठी नवनवीन नंबरवरून मेसेज पाठवून तिला त्रास द्यायचा. गर्लफ्रेंडला ऑनलाईन शॉपिंग खूप आवडायची. ती कायम बॉयफ्रेडकडे महागड्या वस्तूची डिमांड करत होती. जेव्हा ही डिमांड पूर्ण केली नाही तेव्हा गर्लफ्रेंडने त्याच्याशी नाते तोडले. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी युवकाने ही शक्कल लढवली जेणेकरून तिला महागडे गिफ्ट खरेदी करण्यासाठी किती खर्च होतो हे कळावे असं त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, युवकाने कॅश ऑन डिलिवरीवाले मोबाईल, टॅबलेटसह अन्य महागडे गिफ्ट पाठवले होते. नोव्हेंबरपासून हे सुरू होते. फेब्रुवारीच्या व्हेलन्टाईन आठवड्यात प्रत्येक दिवशी विविध प्रोडक्ट घरी यायचे. हा सिलसिला मार्चपर्यंत कायम होता. जेव्हा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनी युवतीला ब्लॉक केले तेव्हा ती पोलिसांकडे पोहचली. बुधवारी या युवकाला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले तेव्हा कोर्टाने त्याला जामीन दिला.