मुंबई : खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी देत दहा कोटींहून अधिक रकमेची मागणी केल्याचा आरोप करत व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांनी कोलकात्याच्या सीआयडी अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. तसेच, आरोपींनी २० लाखांची खंडणी उकळण्याल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.
जितेंद्र नवलानी (४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना वरळीतील सीलाॅर्ड रेस्टाॅरंट, वरळी येथे घडली. यातील फरार आरोपी व कोलकाताचे सीआयडी अधिकारी राजर्षी बॅनर्जी, सुमित बॅनर्जी, सुदीप दासगुप्ता आणि अन्य एका मोबाइलधारक व्यक्तीने अरुण आणि अधिकारी यांच्यावर दबाव टाकून नवलानी आणि त्यांची पत्नी भूमिका नवलानी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वेळोवेळी दहा कोटींहून अधिक रकमेच्या खंडणीची मागणी करत आतापर्यंत २० लाख रुपये उकळल्याचा आरोप केला आहे.
नवलानी असेही चर्चेत... गावदेवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डर्टी बन्स पबमध्ये दोन गटांत हाणामारी झाली होती. तसेच रात्री उशिरापर्यंत हा पब सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही मारहाण केली होती. गावदेवी पोलिसांनी प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत शहाचा नातू यश, त्याचे दोन मित्र, विरोधक आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. एका प्रकरणी व्यावसायिक जितेंद्र ऊर्फ जितू नवलानी यांचे आरोपी म्हणून नाव घेतल्याने ते काढण्यासाठी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माध्यमातून दबाव टाकल्याचा आरोप करत पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती.