राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एका महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. ही महिला अटक करण्यात आलेल्या आपल्या पतीला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. तिने आपल्या तीन चिमुकल्यांना देखील आणलं होतं. महिलेने पोलीस ठाण्यात एकच गोंधळ घातला. पतीला सोडलं नाही म्हणून महिलेने मुलांना गळा दाबून ठार मारण्याची धमकी पोलिसांना दिल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत ही महिला आपल्या तीन मुलांना पोलीस ठाण्याच्या बाहेर सोडून पळून गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोटा ग्रामीणच्या सीमलिया पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. तेथे पोलिसांनी एका तरुणाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली होती. मंगळवारी सायंकाळी पतीच्या अटकेची माहिती मिळताच पत्नी आपल्या तीन मुलांसह पोलीस ठाणे पोहोचली. तेथे तिने पोलिसांना पतीला सोडण्यास सांगितले. पतीला सोडले नाही तर मुलांचा गळा दाबून टाकेन, अशी धमकी तिने पोलिसांना दिली. महिलेच्या हायव्होल्टेज ड्रामामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तिला पोलीस ठाण्याच्या बाहेर हाकलून दिले. नंतर या महिलेने तिन्ही मुलांना कडाक्याच्या थंडीत पोलीस ठाण्याच्या बाहेर सोडले. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने पोलिसांनी त्या मुलांची काळजी घेतली. त्यांच्यासाठी ब्लँकेटची व्यवस्था करून त्यांना खायला दिलं. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलांना बाल कल्याण समितीकडे नेलं. तेथे तीन निरागस मुलांना तात्पुरता आसरा देण्यात आला.
बाल कल्याण समितीच्या सदस्या मधुबाला शर्मा यांनी सांगितले की, एक मुलगी 3 महिन्यांची आहे. एक मूल दीड वर्षाचे तर एक मूल तीन वर्षांचे आहे. या तिघांनाही पोलिसांच्या पथकाने रात्रीच आणलं. तिघांनाही तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. पोलीस पथकाने मुलांना उबदार कपडे घालून त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्यांची काळजी घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक महिलेचा शोध घेत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"