नवी दिल्ली - हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांना कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली आहे. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली आहे. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस मिळाला आहे. मात्र, गौरव अहलुवालिया यांच्या भेटीनंतर धक्कादायक खुलासा करण्यात आला. या दोन तासांच्या भेटीनंतर भारतानेपाकिस्तानवर आरोप केला की कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
पाकिस्तानचे खोटे आरोप मान्य करण्यासाठी हा दबाव आणला जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनाही एक तास उशिरा कुलभूषण यांची भेट पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने घडवून आणली आहे. सुरक्षेचे कारण देत भेटीचं ठिकाणही पाकिस्तानने अचानक बदलले असल्याचं भारतानं म्हटलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून विस्तृत अहवाल मिळाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. या भेटीची माहिती कुलभूषण यांच्या आईलाही देण्यात आली आहे.