लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाइलचे अटक होण्यापूर्वी शेवटचे लोकेशन कळंबोली होते, असे एअरटेलच्या नोडल अधिकाऱ्यांनी पनवेल न्यायालयात सांगितले. यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
बिद्रे यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. मात्र कुरुंदकर यांचे पोलीस दलातील चांगले प्रस्थ लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या प्रकरणी ३१ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ७ डिसेंबर २०१७ रोजी कुरुंदकरला कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यावेळी कुरुंदकरकडे एअरटेलचे सीमकार्ड असलेला मोबाइल होता. ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता हा मोबाइल बंद झाला. तपासासाठी हा मोबाइल आवश्यक होता. मात्र तो पोलीस ठाण्यातूनच गायब झाल्याचे उघड झाले आहे.
नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात कुरुंदकरच्या एअरटेल मोबाइलवर शेवटच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केले. पाटील यांची सरतपासणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी तर उलट तपासणी ॲड. विशाल भानुशाली यांनी घेतली.
हत्याकांडानंतर घेतले नवीन सिम कार्डहत्याकांडानंतर नवीन कार्ड घेतले होते. कुरुंदकरने अश्विनी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाइल स्वत: जवळ ठेवला होता. अश्विनी जिवंत असल्याचे तो भासवत होता. त्यानंतर त्याने एअरटेलचे सिम असलेला मोबाइल घेतला. हा जप्त करावा, त्याच्या माध्यमातून आणखी पुरावे मिळू शकतात, अशी मागणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली होती. मात्र हा मोबाइल हाती लागलेला नाही.