वसई - वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून दंड आकारणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पैसे भिरकावून असभ्य शेरेबाजी करणाऱ्या तीन तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या पंकज राजभर, सुमित वाघरी आणि विवेक सिंग या त्रिकुटावर कारवाई केली होती. त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती. तसेच त्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात दंड जमा करण्यास सांगण्यात आले होते. बुधवारी दुपारी हे तिघे वाहतूक शाखेच्या अंबाडी रोड कार्यालयात आले. त्यांना ४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. महिला कर्मचारी स्वाती गोपाली यांनी तडजोड करत दोन हजार शंभर रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. मात्र, पंकज राजभर याने २ हजारांची नोट काढून गोपाले यांच्या हातात न देता टेबलावर फेकली. ती नोट खाली पडली. त्यानंतर विवेक सिंग याने खिशातून १०० रुपयांची नोट काढून गोपाले यांच्या अंगावर भिरकावली आणि ''या पैशांचा चखणा खा'' असे सुनावले. या प्रकारामुळे गोपाळे यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार तिघांवर सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला. त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.