लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेलेल्या एका १५ वर्षीय मुलीची नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या लेडी सिंघम पोलिस उपनिरिक्षक ज्योती डोके यांनी शिर्डी येथून गुरुवारी सुटका केली. त्यांच्या या कामगिरीमुळे अल्पवयीन मुलगी सहाव्या दिवशी परत मिळाल्याने आई-वडीलांना महिला पोलिस अधिकाऱ्याचे अभार मानले.
नगरमधील दहावीत शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय मुलीला आरोपी शुभम गायकवाड याने प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. अल्पवयीन मुलीला तुझ्याशी लग्न करीन, असे अश्वासन देऊन शुभम याने पळवून नेले होते. घरातून बाहेर पडताना शुभम याने कुठलाही पुरावा मागे सोडला नव्हता. आराेपीला तो वापरत असलेल्या मोबाईलवरून पकडणे पोलिसांना सहज शक्य असते. परंतु, शुभम व अल्पवयीन मुलगी, या दोघेही जाणीवपूर्वक मोबाईल वापरत नव्हते. मोबाईल वापरल्यास आपण पकडले जावू, या भितीने ते मोबाईल वापरत नव्हते. नगरमधून हे दोघे शिर्डीला गेले. तिथे ते एका लॉजवर वास्तव्यास होते. दरम्यान मुलीच्या आई-वडीलांना मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक ज्योती डोके यांची नेमणूक केली होती. आरोपीकडे कुठलाही पुरावा नव्हता. त्यात मोबाईलही आरोपी वापरत नव्हता. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान डोके यांच्यासमोर होते. परंत, डोके यांनी अथक परिश्रम घेत शिर्डीत तपास करत आरोपीला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. आरोपीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले असून, त्याला येत्या ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.