जयपूर: राजस्थानमधील झुंझनूमधील एका महिलेनं प्रशासनाला गंडा घातला आहे. महिलेनं केलेला कारनामा ऐकून पोलीस चक्रावले. एका शिक्षिकेनं बोगस मृत्यू दाखलाच्या मदतीनं तब्बल १४ वर्षे नोकरी केली. या कालावधीत महिलेनं पगारही घेतला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची रवानगी कोठडीत केली आहे.
झुंझनूच्या गुडागौडजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी महिलेनं बोगस कागदपत्रांच्या मदतीनं शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. १४ वर्षे महिला नोकरी करत होती. याबद्दलचा सुगावा कोणालाच लागला नाही. या दरम्यान तिला ८८ लाख रुपये इतकी रक्कम वेतन म्हणून मिळाली.
आरोपी महिलेनं नोकरी मिळवण्यासाठी पतीचं बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं. त्याचा आधार घेऊन तिनं नोकरी मिळवली. पहिल्या पतीला सोडल्यानंतर तिनं आणखी दोन लग्नं केली. या महिलेचं नाव मंजू (३८) असून तिचं सासर तोगडा आहे. मंजू गोविंदगढ पंचायत समितीच्या ढाणी इटावामधील शाळेत शिक्षिका होती. मंजूचा पहिला विवाह जून १९९६ मध्ये रामनिवास जाट यांच्याशी झाला. मात्र ४ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
मंजूनं बाबूलालसोबत दुसरा संसार रचला. दरम्यान पहिला पती रामनिवासचा मृत्यू झाल्याचं मंजूला समजलं. यानंतर तिनं एक कारस्थान रचलं. रामनिवासचं मृत्यू प्रमाणपत्र २० डिसेंबर २००१ रोजी जारी झालं. सरकारी नोकरी मिळत असल्यानं मंजूनं दुसरं लग्न सगळ्यांपासून लपवलं. दुसऱ्या लग्नानंतरही मंजू पहिल्या पतीच्या जागी नोकरी करत होती. २००८ पासून २०२२ पर्यंत तिनं नोकरी केली.
मंजू आणि तिच्या दुसऱ्या पतीमध्ये वाद झाल्यानंतर ३ जून २०११ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर महेश कुमारसोबत मंजूनं लग्न केलं. मात्र त्याच्यासोबतचे संबंधदेखील ताणले गेले. पतीवर नाराज झालेल्या मंजूनं त्याच्याविरोधात हुंड्यांची तक्रार केली. त्यामुळे महेशनं मंजूला धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्यानं एसपींची भेट घेऊन मंजूचं पितळं उघडं पाडलं.