इंदूर: ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून तीन महिलांनी अवघ्या दीड मिनिटांत ४ तोळे सोनं लंपास केलं आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून पोलीस त्याआधारे महिलांचा शोध घेत आहेत. चोरी केल्यानंतर महिला एका रिक्षात बसून निघून गेल्या.
इंदूरमधील मयुरी ज्वेलर्समध्ये तीन महिलांनी चोरी केली. त्यावेळी दुकानात सेल्स गर्ल होत्या. त्याचवेळी तीन महिला दुकानात आल्या. त्यांनी साडी नेसली होती. एकीनं मास्कनं, तर बाकी दोघांनी तोंडावर पदर घेतला होता. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते. तिघींनी ५-५ ग्रॅमचे झुमके दाखवण्यास सांगितले. तिघींनी मागितलेले झुमके दुकानात नव्हते. सेल्स गर्लनी ही बाब तिघींना सांगितली. त्यांनी समोरच्या दुकानातून झुमक्यांचे तीन-चार डब्बे आणले आणि महिलांना दाखवण्यास सुरुवात केली.
दोन महिलांनी दोन्ही सेल्स गर्ल्सना बोलण्यात गुंतवलं. त्याचवेळी तिसरी उभी राहून रेकी करून लागली. तितक्यात एकीनं क्षणार्धात झुमक्यांचा डबा काऊंटरवर खाली घेतला आणि तो पायांमध्ये धरला. त्यानंतर थोड्याच वेळात तिनं तो डबा शेजारी असलेल्या महिलेला दिला. पुढच्या काही सेकंदांत तिघी दुकानातून गेल्या. थोड्या वेळानं सेल्स गर्ल्सनी डबे मोजले, तेव्हा एक डबा कमी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यातून चोरीचा उलगडा झाला.