नवी दिल्ली - शिक्षकांची बदली झाल्याच्या अनेक घटना या नेहमीच समोर येत असतात. पण ती बदली रद्द करण्यासाठी दोन शिक्षकांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. दोन शिक्षिकांनी ट्रान्स्फर ऑर्डर रद्द करायला लावण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बत 24 विद्यार्थिनींना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरी जिल्ह्यातल्या बेहजाम येथे कस्तुरबा गांधी कन्या शाळा आहे.
शाळेतल्या दोन शिक्षिकांनी 24 विद्यार्थिनींना शाळेच्या टेरेसवर ओलीस ठेवलं होतं. बदली आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे कृत्य केल्याचं शिक्षिकांनी सांगितलं. ही घटना गुरुवारी रात्री घडली. काही तासांनंतर मुलींची सुटका करून त्यांना त्यांच्या वसतिगृहात परत आणण्यात अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना यश आलं. लखीमपूर खेरीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातला बदली आदेश रद्द करण्यासाठी शिक्षिकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे कृत्य केल्य़ाचं सांगितलं.
विद्यार्थिनींना ओलीस ठेवल्यानंतर वसतिगृहातल्या वॉर्डन ललिता कुमारी यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी पांडे आणि जिल्हा कन्या शिक्षण समन्वयक रेणू श्रीवास्तव यांना घटनेची माहिती दिली. माहितीनंतर हे दोन्ही अधिकारी शाळेत पोहोचले आणि अनेक तास आरोपी शिक्षिकांना समजावत राहिले. अखेर स्थानिक पोलिसांच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही बोलावून प्रकरण मिटवण्यात आल्याचं पांडे यांनी सांगितलं.
मनोरमा मिश्रा आणि गोल्डी कटियार या दोन शिक्षिकांविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असंही पांडे यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. एक समिती तीन दिवसांत या संदर्भातला अहवाल देईल. तपासात दोषी आढळल्यास सेवा करार रद्द करण्यासह शिक्षिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असं शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत पांडे म्हणाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.