लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Ashish Mishra arrested)
आशिष मिश्राची (Ashish Mishra) १२ तास चौकशी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पसार असलेला आशिष मिश्रा आज सकाळी 10 वाजता सहारनपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. बाईकवरून त्याला एका आमदाराने पोलीस ठाण्यात आणले. यानंतर त्याची 12 तास चौकशी सुरु होती. या काळता त्याला 40 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढविताना तो कुठे होता, हे देखील विचारण्यात आले. यावर तो तेव्हा कुठे होता हे पुराव्यानिशी सांगू शकला नाही.
तसेच त्याने पोलिसांना चौकशीत सहकार्य केले नाही. यामुळे पोलिसांनी त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. आशिष मिश्राला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याचे वडील आणि देशाचे गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी तो निर्दोष असल्याचे तसेच शेतकऱ्यांना उडविताना तो तिथे नसल्याचा दावा करत होते. मात्र, विरोधी पक्ष तसेच शेतकरी नेते सतत आशिष मिश्राच्या अटकेची मागणी करत होते. योगींनी देखील दोषी असे पर्यंत कोणाला अटक केली जाणार नाही असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला हजर राहण्यासाठी त्याच्या दरवाजावर नोटिसा चिकटवतात का, असा सवाल केला होता.