लखीमपूर खीरी हिंसाचारावर सतत नवनवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक जखमी पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांवर चढविण्यात आलेल्या गाड्यांच्या ताफ्यात काँग्रेसचे माजी खासदार अखिलेश दास यांचा पुतण्या होता असे सांगत आहे.
या ताफ्यामध्ये अंकित दास आपल्या फॉर्च्युनर गाडीत होता. लखनऊच्या हुसैनगंजमध्ये राहणाऱ्या या जखमी तरुणाने सांगितले की तो त्या दासच्या गाडीत बसला होता. एका न्यूज चॅनेलला त्याने हे सांगितले आहे. तो तरुण पाच जणांसोबत लखीमपूरच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्याच्या पुढील थार जीप लोकांना उडवत पुढे जात होती. अंकित दासची काळी फॉर्च्युनर त्या थारच्या मागे चालली होती. याचवेळी बाहेर असलेल्या आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या थार जीपमध्ये कोण कोण होते याची माहिती देण्यास मात्र त्या तरुणाने नकार दिला.
थार जीपचा चालक आणि त्याच्या शेजारी पुढील सीटवर बसलेला शुभम मिश्रा नावाच्या भाजपा नेत्याची आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावाने हत्या केली. तर आणखी एक नेता सुमित जयस्वाल याने तेथून पलायन करत जीव वाचविला. याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये सुमित जीपचा दरवाजा खोलून बाहेर पळताना दिसत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जर तो तेथून पळाला नसता तर तो वाचला नसता.
लखीमपुर हिंसाचार प्रकरणी चार शेतकऱ्यांसह आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. युपी सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सरकारी नोकरी देखील देण्याचे कबुल करण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.