लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखीपुरात येथे काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर, संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली आहे. त्यामध्ये जखमी झालेल्या एका पत्रकाराचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे, येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 व पोहोचली आहे. आता, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून केंद्रीयमंत्र्यांच्या मुलाला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडलं. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्या अंगावर गाडी आदळण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आशिष मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्या, मृत्यूस जबाबदार, अपघात यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तीव्र आंदोलन केल्याने अखेर मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे.
काय आहे घटना ?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर, आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप भाजप समर्थकांकडून होत आहे.