नागपूर : एमबीबीएसमध्ये ॲडमिशन करून देण्याची थाप मारून ठिकठिकाणच्या पालकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने या रॅकेटचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला. नरेंद्र लक्ष्मण इंगळे असे त्याचे नाव असून, तो कामठी मार्गावरील गुलमोहर अपार्टमेंट (टेका नाका) भागात राहतो.
मुलांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या पालकांना मार्गदर्शनाच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क करायला लावायचा. त्यांना मुलांची ॲडमिशन करून देण्याची हमी देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे, अशी या रॅकेटची कार्यपद्धती आहे. अशा प्रकारे या रॅकेटने ठिकठिकाणच्या पालकांकडून कोट्यवधी रुपये हडपले आहेत. नागपूर वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, पुण्यासह ठिकठिकाणचे पालक या रॅकेटच्या जाळ्यात अडकून फसलेले आहेत. गेल्या चार वर्षांत सीताबर्डी, अजनी, धंतोलीत या प्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, या रॅकेटच्या बनवाबनवीला आळा घालण्यात पोलिसांनी फारशी उत्सुकता न दाखविल्याने या भामट्यांचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता. लोकमतने ३, ४ आणि ५ ऑक्टोबर २०२१ला ‘एमबीबीएस ॲडमिशन रॅकेट’च्या नावाने वृत्तमालिका प्रकाशित करून या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांच्या फसवणुकीची पद्धतही सविस्तरपणे प्रकाशित केली होती. लोकमतच्या वृत्तमालिकेची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या रॅकेटवर नजर वळविली होती. या पार्श्वभूमीवर, आरोपी नरेंद्र लक्ष्मण इंगळे हा पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे कारवाईची जबाबदारी सोपविली. त्यानुसार, कारवाईची तयारी करण्यात आली.फिर्यादी सुनील प्रल्हाद नागपुरे (यवतमाळ), किशोर मेश्राम आणि रवींद्र वाघमारे (वर्धा) यांना त्यांच्या पाल्याची ॲडमिशन एमबीबीएसला करून देतो. त्याबदल्यात ५० ते ६० लाख रुपये फी आणि डोनेशनच्या नावाखाली आपल्याला १० लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले होते. आरोपी इंगळे हा ठिकठिकाणच्या शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव घेऊन ही रोकड मागत होता. कोणत्याही कॉलेजचा संचालक, मालक अथवा कर्मचारी नसताना तो एमबीबीएसची ॲडमिशन कसा करू शकतो, असा प्रश्न होता. त्याचे मात्र तो उत्तर देत नव्हता. त्याने ॲडमिशन करून देण्याच्या नावाने एक लाख रुपये ॲडव्हॉन्स मागितला होता. नागपुरे, मेश्राम आणि वाघमारे यांनी इंगळेची भामटेगिरी उघड करण्यासाठी आणि ठिकठिकाणच्या पालकांची फसवणूक थांबवण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे एपीआय ईश्वर जगदळे, हवालदार राजेंद्र ठाकूर, नायक सुधीर सोंधरकर, अजय पोहाणे, नितीन वासने आणि सूरज ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळी इंगळेच्या सीताबर्डीतील कार्यालयात छापा घातला. त्याने एक लाखांची रोकड स्वीकारताच त्याच्या मुसक्या बांधल्या.
रोकड, सोनसाखळी लॅपटॉप जप्त
आरोपी इंगळे याच्याकडून एक लाखांची रोकड, सोनसाखळ्या, अंगठी, लॅपटॉप, तीन मोबाईल असा सुमारे पाच ते सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला आज कोर्टात हजर करून त्याची ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. त्याने अशी किती जणांची फसवणूक केली आणि त्याच्या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे, त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी आणि उपनिरीक्षक विजय नेमाडे करीत आहेत.
पोलिसांकडून आवाहनअशा प्रकारे ज्यांची कुणाची फसवणूक झाली असेल त्यांनी सीताबर्डी पोलीस किंवा गुन्हे शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.