रवींद्र चांदेकर
महागाव (यवतमाळ) : जिल्हा पुरवठा निरीक्षक यवतमाळ, पोस्ट ऑफिस पोस्टल पेमेंट बँक भोकर आणि अन्य सरकारी आस्थापनांमध्ये लिपिकपदावर निवड झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचे प्रकरण येथे उघडकीस आले. निकिता उमेश टनमने या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. चौकशीनंतर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारी नोकरीच्या नावाने फसवणूक झालेल्या चार बेरोजगारांनी बुधवारी पोलिसांपुढे कैफियत मांडली. दोघांनी उमरखेड पोलिसांकडे तक्रार दिली. निकिता टनमने या महिलेने महागाव पोलिसांत तक्रार दिली. सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा चुना लावल्याचा प्रकार उघड झाल्याने दोन्ही तालुक्यांतील तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र, मेडिकल टेस्ट, मुलाखत, सिलेक्शन लेटर सारेच काही बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील तरुणांना फसवणारा मोरक्या शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. निकिताचे वडील यादवराव वानखेडे यांनी मुलीच्या नोकरीसाठी चार लाख रुपये या भामट्यांना सुपुर्द केले, अशी माहिती समोर आली आहे.
जिल्हाध्यक्ष निवड समिती पोस्टल पेमेंट बँक विभाग यांच्या नावाने निकिताला ८ ऑगस्ट २०२३ रोजी पोस्टल पेमेंट बँक भोकर येथे सहायकपदावर निवड झाल्याचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले. १४ ऑगस्ट रोजी त्यांना रुजू होण्यास सांगण्यात आले. दोन भामट्यांनी त्यांना महागाव पोस्ट ऑफिसमध्ये बोलावले. तेथे पैसे घेतले. भोकर येथे गेल्यानंतर नियुक्तीपत्र आणि सर्व बनावट असल्याचे पाहून निकिताला भोवळ आली.
उमरखेड येथील आशिष मधुकर चव्हाण या बेरोजगार तरुणालाही यवतमाळ जिल्हा पुरवठा निरीक्षक कार्यालयात लिपिकपदावर नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र देऊन पाच लाखांना गंडा घालण्यात आला. उमरखेड येथील दुसऱ्या एका तरुणास अशाच पद्धतीने खोट्या नोकरीचे आमिष देऊन पाच लाख रुपयांनी लुबाडल्याचे समोर आले आहे. उमरखेड आणि महागाव येथील फसवणूक झालेले सुशिक्षित बेरोजगार बुधवारी महागाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी धडकले. त्यातील दोघांनी यापूर्वीच उमरखेड पोलिसांकडे तक्रार दिल्याचे कळते. फसवणूक झालेल्यांची संख्या बरीच मोठी असल्याची चर्चा आहे.
भामट्यांनी केला जबरदस्त प्लॅन
बेरोजगारांची फसवणूक करण्यासाठी भामट्यांनी जबरदस्त प्लॅन केल्याचे समोर आले आहे. उमेदवारांना मुलाखतपत्र, वैद्यकीय चाचणीचे पत्र आणि नियुक्तीपत्र पाठवताना निवड मंडळाच्या कागदपत्राची कॉपी करण्यात आली. नियुक्तीपत्रावर राज्यपालांचा संदर्भ, अशोकस्तंभावरील तीन सिंहांची राजमुद्रा आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा लोगो छापण्यात आला. ही बनावट कागदपत्रे पाहून पोलिस यंत्रणा चक्रावून गेली. या सोनेरी टोळीचे नेटवर्क जिल्ह्यात मोठे असून, यात बडे मासे हाती लागतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.