मुंबई - कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या खात्यातून १५ वेळा, तर पवईतील मुख्याध्यापकाच्या खात्यातून ३ वेळा केलेल्या व्यवहारातून लाखो रुपये काढल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. आॅनलाइन ठगांविरुद्ध जूहू आणि पवई पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बदलापूरचे रहिवासी असलेले दत्तात्रय पांडुरंग पानसंडे (४९) हे कूपर रुग्णालयात नोकरीला आहेत. सोमवारी रुग्णालयात काम करत असताना, पावणे एक ते दोन दरम्यान मोबाइलवर धडकलेल्या संदेशामुळे त्यांना धक्का बसला. त्यांच्या एटीएम कार्डद्वारे १५ वेळा केलेल्या विविध व्यवहारांतून तब्बल १ लाख ५० हजार ३५४ रुपये काढण्यात आले होते. त्यांच्या कार्डची माहिती मिळवून कोणीतरी बनावट कार्डद्वारे हे पैसे काढले होते. याबाबत त्यांनी बँकेला कळवून जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू आहे.दुसºया घटनेत, पवईचे रहिवासी असलेले शिक्षक घनश्याम देवळेकर (५१) यांच्या खात्यातूनही २५ हजार रुपये काढण्यात आले होते. १० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या एटीएम कार्डद्वारे ३ वेळा केलेल्या व्यवहारातून ही रक्कम काढण्यात आली होती. त्यांनी याबाबत बँकेकडे विचारणा केली, तेव्हा बँकेकडून पैसे परत मिळतील, असे समजताच त्यांनी दुर्लक्ष केले. सोमवारी त्यांनी बँकेत याबाबत पुन्हा विचारणा केली. मात्र, त्यांना बँकेकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुख्याध्यापकाच्या खात्यातून लाखो रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 3:29 AM