नागपूर : दुचाकीवर आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १७ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विविध ठिकाणाहून रोकड गोळा करून ती बँकेत, एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज विविध ठिकाणाहून १७ लाखांची रोकड गोळा केली. ही रोकड बँकेत जमा करण्यासाठी कंपनीचे दोन कर्मचारी एका दुचाकीवर निघाले. आमदार निवास जवळच्या राजाराणी चौकात येताच मागून दोन दुचाकीवर आलेल्या सहा लुटारूंपैकी एकाने लाथ मारून दुचाकीवरील कर्मचाऱ्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळची १७ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून लुटारू पळून गेले. या घटनेमुळे हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या वरिष्ठांना लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्ष आणि सीताबर्डी पोलिसांना माहिती कळविण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या लूटमारीच्या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. सीताबर्डीचा पोलीस ताफा, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे पीडित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या फुटेजच्या मदतीने लुटारूचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.