मुंबई - दोन किलो सोन्याची बिस्किटे २४ लाख ५० हजार रुपयात देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन पसार झालेल्या टोळीचा माहिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाख ५८ हजार रुपये जप्त केले आहेत.
ओळखीच्या व्यक्तीने करून दिलेल्या ओळखीतून यातील फिर्यादीची आरोपींशी ओळख झाली होती. त्या आरोपींनी फिर्यादीला २४ लाख ५० हजार रुपयात दोन किलो सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवले.आरोपींच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने स्वस्तात मिळणारे सोने खरेदी करण्याची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे २ सप्टेंबर रोजी आरोपींनी फिर्यादीला माहिम रेल्वे स्थानकाजवळ बोलावले. तेथे आल्यानंतर एका व्यक्तीने फिर्यादीला रहेजा हॉस्पिटलसमोरील नागोरी हॉटेल येथे घेऊन गेला. त्याठिकाणी दुसरा इसम आला. दोघांनी फिर्यादीने पैसे आणल्याची खात्री करून तिसऱ्या इसमाला तेथे बोलावले. तिसऱ्या इसमाने कातडी बेल्ट दाखवून त्यात सोन्याची बिस्किटे असल्याचे सांगितले. मात्र, पहिल्यांदा फिर्यादीक़डे पैशांची मागणी करून ती रक्कम ताब्यात घेतली. त्यानंतर फिर्यादीला सोने देतो, असे म्हणून हॉटेलबाहेर बोलावले. त्यावेळी सहआरोपीने सोने देणार होता, त्या इसमाला वाहनात बसवून तेथून पळ काढला. या गडबडीत इतर आरोपी असलेल्या इसमांनी देखील तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर याप्रकरणी फिर्यादीने माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याता काही एक पुरावा नसताना त्यांच्या गुन्हा करण्याची पद्धत व गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी एकाच ठिकाणाहून तिघांना अटक केली. त्यांच्यापैकी मुख्य आरोपीकडून १५ लाख ५८ हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर इतर 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.