मुंबई - मुंबईत प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात पुन्हा हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. झोन ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी मुजोरी करत राजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. हा संतापजनक प्रकार आज घडला आहे. स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते हे रांगेशिवाय आपल्या ओळखीच्या व्यक्तींना थेट स्टेजवर चढून चरणस्पर्श घेण्यासाठी बाप्पाच्या समोरून एक मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. या खुल्या मार्गाद्वारे अतिमहत्वाच्या व्यक्तींना आणि ओळखीच्या व्यक्तींना रांगेशिवाय झटपट दर्शन दिले जाते. त्याचठिकाणी लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनतर पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. ही अरेरावी पाहून पोलीस उपायुक्त आणि अन्य पोलीस अधिकारी संतापले होते.
दरवर्षी होणारी गर्दी पाहता मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येतो.मात्र, कर्तव्यावर असलेले पोलीस आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यात ओळखीच्या व्यक्तींना थेट रांगेशिवाय बाप्पाचे चरण दर्शन देण्यावरून तसेच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणावरून धक्काबुक्की, हाणामारी राजाच्या दरबारात होतच असते. त्याचप्रमाणे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना काही कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरून त्यांच्याशी दादागिरी केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त यांना राग अनावर झाला नाही. त्यांनी त्या मुजोर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी बॅरिकेट चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. याआधी देखील एका महिला पोलिसांच्या श्रीमुखात राजाच्या कार्यकर्त्याने लगावली होती. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी अभद्रपणे कार्यकर्ते वागतात हे अनेकदा समोर आले आहे.