नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा ड्रग्जची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 900 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. NCB च्या या यशस्वी कारवाईत 82.53 किलो पेक्षा जास्त उत्तम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले असून, या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाच्या जप्तीसह लोकेश चोपडा आणि अवधेश यादव या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकेनची खेप अहमदाबाद आणि सोनीपत येथून दिल्लीत आणण्यात आली होती. दिल्लीहून पुढे ऑस्ट्रेलियाला पाठवली जात होती. कोकेनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे. या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड दुबईत बसला असून तो दिल्लीचा मोठा हवाला व्यावसायिक असल्याचे बोलले जात आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटककोलकातामध्येही एनसीबीला मोठे यश मिळाले आहे. NCB ने गौतम मंडल नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक केली. बांग्लादेशला कोडीन आधारित कफ सिरप (CBCS) तस्करीसाठी तो वॉन्टेड होता. याशिवाय सोन्याच्या तस्करीतही त्याचा हात आहे. याप्रकरणी त्याच्यावर 03 डीआरआय गुन्हे दाखल आहेत. गौतम मंडल हा एनडीपीएसचा कट्टर गुन्हेगार आहे. त्याचे संघटित गुन्हेगारी सिंडिकेट मोडून काढण्यासाठी DRI कोलकाता आणि STF पश्चिम बंगालसोबत संयुक्त तपास केला जाईल.
गृहमंत्री अमित शाहांनी एनसीबीचे अभिनंदन केलेएनसीबीच्या या कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया X वर पोस्टही केली आहे. त्यांनी लिहिले - बेकायदेशीर ड्रग्जच्या विरोधात एकाच दिवसात मिळालेले दोन मोठे यश भारताला ड्रग्जमुक्त करण्याचा मोदी सरकारचा संकल्प दर्शवतात. NCB ने आज नवी दिल्लीत 82.53 किलो कोकेन जप्त केले. ड्रग्ज रॅकेटविरोधात आमची मोहीम सुरूच राहणार आहे. या मोठ्या यशाबद्दल एनसीबीचे अभिनंदन..!