बदलापूर: बदलापूरजवळच्या मुळगावमध्ये खंडोबाच्या लग्नासाठी शेकडोंची गर्दी जमल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवत ही गर्दी जमल्याने कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम असताना देखील पोलिसांना त्याची चाहूल लागली नाही.
बदलापूरजवळच्या मुळगावमध्ये डोंगरावर खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरात आज संध्याकाळी ५ वाजता खंडोबाचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. सध्या लागू असलेल्या कोरोनाच्या नियमांनुसार या सोहळ्याला मोजके ग्रामस्थ किंवा पुजारी उपस्थित असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या सोहळ्यासाठी डोंगरावर शेकडोंची गर्दी जमल्याचे समोर आले. इतकंच नव्हे, तर बेंजो लावून भंडाऱ्याची उधळण करत शेकडोंची गर्दी बेफाम होऊन नाचत असल्याचे व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. या गर्दीत सोशल डिस्टनसिंग तर दूरच, पण कुणीही साधा मास्क सुद्धा घातलेला नव्हता. आधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमांसाठी फक्त ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असतानाही खंडोबाच्या मंदिरात शेकडोंची गर्दी जमल्याने कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी मुळगावचा खंडोबा मंदिरात लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतो. मात्र यंदा करोणाचे नियम धाब्यावर बसवून हा लग्नसोहळा पार पडल्याने पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, या सगळ्याबाबत बदलापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलीस या गर्दीबाबत अनभिज्ञ असल्याचे आढळून आले.