हाळी हंडरगुळी (जि.लातूर) : जिल्ह्यातील उदगीर - अहमदपूर महामार्गावर हाळी हंडरगुळी गावानजीक एका वाहनासह तब्बल 17 लाख 61 हजार 300 रुपयांचा गांजा पकडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यावेळी चालकासह अन्य दोघांना पोलिसांना ताब्यात घेतले असून, एकूण 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, बीदर-नांदेड महामार्गावर हाळी हंडरगुळी (ता. उदगीर) गावानजीक वाढवणा पोलिसांकडून गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वाहन तपासणी केली जात होती. दरम्यान, अहमदपूरकडून उदगीर मार्गे कर्नाटक राज्यात निघालेल्या जीपला (ए.पी. 28 बी.एच. 0108) अडवून तपासणी केली जात होती. संशय असल्याने पोलिसांनी कसून चौकशी अन् तपासणी केली असता, जीपमधील 9 पांढऱ्या पोत्यात 175 किलो 13 ग्रँम असा एकूण तब्बल 17 लाख 61 हजार 300 रुपयांचा गांजा आढळून आला. यावेळी चालकासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जीपही जप्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार, उदगीर येथील तालुका दंडाधिकारी खरात हे घटनास्थळी लाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत दोघा पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे सांगितले.
नाकाबंदीत अडकले गांजासह तिघे जण...
सदरचा गांजा कोठू आला आणि कुठे जात आहे. याबाबत सपोनि. नरवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ओडिसा राज्यातून सदरचे तिघे जण आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते कर्नाटक राज्यातील माळेगावकडे निघाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिक चौकशीतून वास्तव समोर येणार आहे, असेही ते म्हणाले.