लातूर :
जिल्ह्यातील जळकोट, अहमदपूर, किल्लारी, उदगीर ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोड्यांप्रकरणी दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून आठ घरफोड्यांचा उलगडा झाला आहे. यावेळी सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या विशेष पथकाकडून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, विशेष पथकाने गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार माहिती मिळवत असताना, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हा त्यांच्या घरी येणार आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलीस पथक तात्काळ औसा तालुक्यातील भादा तेथे पोहोचले आणि सापळा लावला. काळी वेळात घरातून संशयित आरोपी नामे आकाश ऊर्फ बाबूराव कांबळे (वय २१) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, त्याने साथीदारांसोबत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार साथीदार माणिक बालाजी नरवटे (वय ३५, रा. तांबटसांगवी, ता. अहमदपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानेही विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या घरफोडी, चोरीतील सोन्याचे दागिने (किंमत २ लाख ९७ हजार ४०० रुपये) जप्त केले आहेत. तर अन्य साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ताब्यातील दोघांनी जळकोट, अहमदपूर, किल्लारी, उदगीर ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या आठ घरफोड्यांची कबुली दिली.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सहायक फौजदार संजू भोसले, पोलीस अमलदार राम गवारे, सुधीर कोलसुरे, बंटी गायकवाड, माधव बिलापटे, सिद्धेश्वर जाधव, नाना भोंग, सचिन धारेकर, जमीर शेख, नकुल पाटील, केंद्रे यांच्या पथकाने केली.