लातूर : लग्न साेहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार, काेयता घेऊन नाचणाऱ्या नवरदेवासह जवळपास १५ जणांविराेधात विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, यातील पाचजणांना पाेलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे, तर निसटलेल्या आराेपींमध्ये नवरदेवाचाही समावेश हाेता. मंगळवारी पाेलिसांनी नवरदेवाच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून काेयता, तलवार जप्त केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, एलआयसी काॅलनी परिसरात वास्तव्याला असलेल्या शुभम तुमकुटे याचा विवाह साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. दरम्यान, विवाह साेहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदीच्या कार्यक्रमात डाॅल्बीवर माेठ्या आवाजामध्ये ‘मैं हू डाॅन’ हे गाणे लावून, हातात तलवार, काेयता-कत्ती घेऊन नाचत हाेते. यातून समाजामध्ये, सार्वजनिक ठिकाणी दहशत परसविण्याच्या उद्देशाने आणि इतर आराेपींनी गाेंधळ आणि धिंगाणा घातला. या सर्व घडामाेडींचा व्हिडिओ साेशल मीडियात व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांच्या हाती लागला.
याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात रविवारी १५ जणांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. यातील पाचजणांना पाेलिसांनी अटक केली असून, इतर आराेपी निसटले हाेते. दरम्यान, पळालेल्या नवरदेवाच्या शाेधासाठी पाेलीस पथक मागावर हाेते. मंगळवारी नवरदेव शुभम व्यंकटराव तुमकुटे (वय २४ रा. एलआयसी काॅलनी, लातूर), अमाेल पिराजी टाेंपे (२२ रा. गाेपाळ नगर, लातूर), विश्वजित संजय लाेंढे (२५ रा. गाेपाळ नगर, लातूर) आणि एका अल्पवयीन आराेपीला अटक केली आहे, अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी दिली.
चार आराेपींच्या मागावर पाेलीसयाप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात जवळपास १५ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील ९ जणांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यातील मिलिंद हुबे, हरीष पाटील (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), रुद्रा हाेनराव (रा. कव्हा नाका, लातूर) आणि स्वप्निल बियाणी (रा. गाेपाळनगर, लातूर) हे अद्यापही हाती लागले नाहीत, असे पाेलीस सूत्रांनी सांगितले.