लातूर : जिल्ह्यासह उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांच्या स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून २५ मोटारसायकलीसह १० लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण १८ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा पोलीस पथकाने उलगडा केला आहे.
पोलिसांनी सांगितले, नवीन रेणापूर नाका परिसरात चोरीतील मोटारसायकलीचा खरेदी-विक्री व्यवहार होणार आहे, अशी माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. या माहितीच्या आधार पोलिसांनी सापळा लावला. यावेळी चोरीच्या मोटरसायकलचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, सोबत असलेल्या पवनराज गुलाब चव्हाण (वय २२, रा. बेलकुंड ता. औसा), महादेव शिवाजी गरड उर्फ शुभम पाटील (वय २३ रा. अंबुलगा ता. चाकूर), अक्षय रावसाहेब देमगुंडे (रा. हिप्परगा, ता. उदगीर) यांची त्याने नावे सांगितले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, लातूर शहरासह बाहेरील जिल्ह्यातील मोटारसायकली चोरून ते एकत्र जमा करतात. शुभम पाटील नावाने फेसबुक अकाउंट उघडले असून, त्यावरुन जिल्ह्यातील विविध लोकांना मोटारसायकली विक्री केले जात असल्याचे सांगण्यात आले. विविध ठिकाणाहून चोरलेल्या, चोरी करुन लपविलेल्या १७ मोटारसायकल (किंमत ६ लाख ३८ हजार) स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. तर एमआयडीसी पाेलिसांनी ७ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. लातूर जिल्ह्यात ८ गुन्हे, उस्मानाबाद जिल्ह्यात २ गुन्हे, सोलापूर जिल्ह्यातील १ गुन्हा उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिराजदार, पोलीस हवालदार बेल्लाळे, पोलीस नाईक बुजारे, पोलीस नाईक मुन्ना मदने, पोलीस नाईक अर्जुन राजपूत, पोलीस नाईक किरण शिंदे यांच्या पथकाने केली आहे.