देवणी (जि. लातूर) : नांदेड बीदर राज्य मार्गावरील तोगरी मोडजवळ तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी जवळपास दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, पानमसाला जप्त केल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारी पाच लाख रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेला पान मसाला, गुटखा राजरोसपणे आणला जातो. २० फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणारी कार देवणी पोलिसांनी नांदेड बिदर रस्त्यावर तोगरीजवळ पकडली. या गाडीत शासन प्रतिबंधित असलेला नामांकित कंपनीचा गुटखा, पान मसाला, तंबाखू, आदी जवळपास २ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त केला. तसेच कारही ताब्यात घेतली आहे.
याबाबत २२ फेब्रुवारी रोजी लातूर येथील अन्नसुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात अझहर हमीदसाब शेख (रा. सिद्धार्थनगर, निडेबन वेस, उदगीर) यांच्याविरुद्ध कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादंवि व अन्नसुरक्षा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. विनायक कांबळे करीत आहेत