राजकुमार जाेंधळे, लातूर: शहरासह जिल्ह्यातील विविध २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच रात्री अचानकपणे पाेलिसांनी काेम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये रेकाॅर्डवरील ३६ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली असून, हाॅटेल्स, लाॅजची तपासणी करण्यात आली. शिवाय, जिल्हाभरात नाकाबंदी करून ९३२ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी काेम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले हाेते. दरम्यान, रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत काेम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. लातूर जिल्ह्यात ३४ अधिकारी, १४० अंमलदार आणि ९० होमगार्डचा समावेश असलेल्या विविध पथकांकडून हाॅटेल्स, लाॅजची तपासणी करण्यात आली. शिवाय, फरार आरोपींना अटक करणे, पॅरोल आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे, संशयित वाहनांची तपासणी, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लातुरातील ७७ लॉज, हॉटेलची तपासणी केली.
लातुरात विविध ठाण्यात जुगाराचे २८ गुन्हे दाखल
जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत २५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, या वेळी ९३२ वाहनांची तपासणी केली. रेकॉर्डवरील ३६ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तर जुगार कायद्यानुसार २८ गुन्हे दाखल करण्यात आला आहे.