दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशातही बिश्नोई गँगची एन्ट्री झाली आहे. गोल्डी ब्रारने उत्तर प्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाला धमकी दिली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियामध्ये सतत सक्रिय असतो. गँगस्टर गोल्डी ब्रारने पश्चिम उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका व्यावसायिकाला व्हॉईस नोट पाठवून धमकी दिली होती. व्यावसायिकाला एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून खंडणीचा कॉल आला आहे.
Whatsapp वर आला कॉल
उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, तक्रारदाराला 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता Whatsapp वर आंतरराष्ट्रीय नंबरवरून पहिला कॉल आला. कॉलरने स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार म्हणून दिली, जो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. म्हणाला की, "सावध राहा, माझी तुझ्यावर नजर आहे." तक्रारदाराला सुरुवातीला हा फेक कॉल वाटला, मात्र 12 सप्टेंबर रोजी त्याला त्याच नंबरवरून पुन्हा कॉल आला आणि कॉलरने त्याला पुन्हा धमकी दिली.
यूपी पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम 504 आणि 507 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हॉईस नोटमध्ये म्हटले आहे की, "...जर जीवन असेल तर जग आहे, काम करत राहा... माझा आवाज तपास, चांगलं काम करत आहे. जर तुला माझ्या आवाजाची चाचणी करून घ्यायची असेल तर करून घे." ब्रार सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असून, त्यांच्या विरोधात या वर्षी जुलैमध्ये इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
सिद्धू मूसवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड
पंजाबमधील मुक्तसर साहिब येथे राहणारा ब्रार 2017 मध्ये कॅनडाला गेला होता. याआधी जूनमध्ये गायक आणि रॅपर हनी सिंगने ब्रार यांने धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. तो सिद्धू मूसवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.