अमरावती - गरीब कुटुंबातील मुलगी म्हणून सासरची मंडळी मारहाण करीत होती. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दोन्ही जुळ्या मुली मरण पावल्या. पैशांच्या हव्यासापोटी सासरच्यांचा अन्याय इतका वाढला की, त्यांनी सुनेला चक्क विहिरीत ढकलून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली. मात्र, त्यानंतर तिला उपचारासाठी वणवण भटकंती करावी लागली. जळगाव जामोद येथील शीतल मोहन भगत (२५) या महिलेला जखमी अवस्थेत रविवारी रात्री अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलीवर झालेल्या अन्यायाला तिच्या आईने वाचा फोडत या धक्कादायक घटनेचे कथन केले. शीतल भगत हिला रविवारी रात्री तिची आई व भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. शनिवारी रात्री शीतलला पतीसह सासरच्या मंडळीने मारहाण केली तसेच दोन ते तीन फूट पाणी असलेल्या विहिरीत ढकलले. ती दगडांचा मार लागून गंभीर जखमी झाली. सासरच्यांनीच तिला विहिरीबाहेर काढले आणि माहेरच्यांना घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर माहेरची मंडळी मुलीच्या उपचारासाठी अमरावतीला आले. तत्पूर्वी, शीतलला जळगावातील शासकीय रुग्णालयात नेले होते. तेथून तिला खामगाव रेफर करण्यात आले. तेथून उपचार न करता तातडीने अकोला रेफर करण्यात आले. शीतलला घेऊन आई लीला श्रीराम नानकदे व तिचा भाऊ संतोष हे दोघेही रुग्णवाहिकेद्वारे अकोल्याला पोहोचले. तेथेही डॉक्टरांच्या तपासणीनंतर अमरावतीला हलविण्याचा सल्ला मिळाला. शीतलला रात्री ८.५० वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. मात्र, इर्विन रुग्णालयात दाखल झाल्यावरही तिला तत्काळ उपचार मिळाला नाही. तिची आई मुलीच्या पलंगावर बसून उपचाराची प्रतीक्षा करीत होती. इर्विनमधील रुग्णांच्या गर्दीमुळे शीतलवर अर्ध्या तासानंतरही उपचार सुरू झाला नव्हता. सदर प्रतिनिधीने विचारणा केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु करण्यात आला. शीतल आता वॉर्ड १४ मध्ये उपचार घेत आहे. मुलीवरील अन्यायाचे कथनजळगाव जामोद येथील सुनगावात राहणाऱ्या लीला नानकदे यांनी मुलगी शीतलचे भगत कुटुंबातील मोहन याच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न लावले. सासरची मंडळी तिला माहेरच्या गरिबीमुळे त्रास देत होते. सहा महिन्यांपूर्वी शीतलने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. सिझर झालेल्या अवस्थेतही सासरच्यांनी शीतलचा छळ केला, असे लीला नानकदे म्हणाल्या. दोनदा जबाब शीतलचे जळगावातील रुग्णालयात व अकोला येथेही जबाब नोंदविण्यात आले. दोन्ही जबाबात पतीने व सासरच्यांनी मारहाण केल्याचे ती म्हणाली. त्यामुळे तिचे तिसऱ्यांदा जबाब नोंदवावे की नाही, हा प्रश्न अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलिसांना पडला होता.
मारहाण करून सासरच्यांनी ढकलेले विहिरीत; उपचारासाठी महिला पोहोचली अमरावतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 9:28 PM
उपचारासाठी ती महिला जळगावातून पोहोचली अमरावतीत : आरोग्य यंत्रणेची अनास्था
ठळक मुद्देमुलीवर झालेल्या अन्यायाला तिच्या आईने वाचा फोडत या धक्कादायक घटनेचे कथन केले. शनिवारी रात्री शीतलला पतीसह सासरच्या मंडळीने मारहाण केली तसेच दोन ते तीन फूट पाणी असलेल्या विहिरीत ढकलले.