जळगाव - दुचाकी थांबवून मोबाईलवर बोलत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार सुनील पंडीत दामोदरे यांना मुजोर कार चालक व त्याच्या भावाने बेदम मारहाण करुन डोक्यात लोखंडी हत्यार टाकून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जितू अरुण चांगरे (रा.नवल नगर, जळगाव) व त्याच्या भावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार सुनील दामादरे हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीने सरकारी कामानिमित्त एमआयडीसी पोलीस स्टेशनला जात असताना पांडे चौकाजवळील पोस्ट कार्यालयाजवळ मोबाईलवर कॉल आल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून ते बोलत असताना लाल रंगाच्या कारमधून (क्र.एम.एच.१९..६५५५) आलेल्या जितू अरुण चांगरे (रा.नवल नगर) याने दामोदरे यांना ढकलले, त्यावेळी दामोदरे यांनी त्यास जाब विचारला असता ‘तू मुझे जानता नही, मै जितू अरुण चांगरे हू ! तु जादा बोल मत, तुझे किसको बुलाना है, उसको बुला मै डरता नही, मै आपको जाने नही दुंगा’ असे धमकावत कोणाला तरी फोन लावून कारच्या डिक्कीतील लोखंडी पान्हा काढला व थोड्याच वेळाने त्याचा भाऊ देखील तेथे दाखल झाला. यावेळी दोघांनी दामोदरे यांना मारहाण करुन डोक्यात लोखंडी पान्हा टाकून गंभीर जखमी केले. हातातील कागदपत्रेही दोघांनी फेकून दिले. यावेळी गर्दी जमा झाल्याने चांगरे याने तेथून पलायन केले.
खासगी रुग्णालयात उपचारया घटनेनंतर दामोदरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत संपर्क करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने सरकारी वाहनाने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जितू चांगरे व त्याचा भाऊ या दोघांविरुध्द मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अकबर पटेल करीत आहेत.
खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही