नालासोपारा (प्रतिनिधी) :- पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोड्या झालेले गुन्हे दररोज दाखल होत असल्यामुळे या घरफोड्या चोरट्यांमूळे पोलिसांना डोकेदुखी ठरली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई टीमने अशाच घरफोड्या करणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून 44 घरफोड्या उघड करून 21 लाख 16 हजारांचे 52 तोळे 900 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. नालासोपारा 20, अर्नाळा 1 आणि 24 तुळींज असे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील 44 घरफोड्या उघड केल्या आहेत.
एलसीबीच्या सहायक पोलीस निरीक्षका सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, महादेव वेदपाठक, जनार्दन मते, विकास यादव, संजय नवले, रमेश अलदर, सागर बारवकर, आश्विन पाटील, चंद्रकांत कदम, जनार्दन मते, प्रशांत पाटील, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, अमोल कोरे, अमोल तटकरे, मुकेश तटकरे, मनोज सकपाळ, मंगेश चव्हाण, शरद पाटील, प्रशांत ठाकूर या दोन टीमने मनोज शर्मा (26), बबलू जयस्वाल (30) आणि बाबू मोहिते (22) या तिघांना पकडले आहे. या तिघांनी गुन्हा कबूल केला असून बंद घरांचा सर्वप्रथम सर्व्हे करायचे व नंतर त्या घरात कोणी नसताना घरफोडी केली जायचे पोलीस तपासात सांगितले आहे. तिन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिन्ही आरोपीनी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील छेडा पार्क मधील चिराग अपार्टमेंटच्या सदनिका नंबर 101 मध्ये राहणारे राजेश विसंजी भेदा (48) यांच्या घरी 22 फेब्रुवारी 2019 ला दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या घरी कोणी नसताना दरवाजाचा लॉक तोडून 2 लाख 4 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून नेल्याचा गुन्हा तुळींज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता याचाच तपास एलसीबी करत असताना या सर्व घरफोडयांची उकल केली आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का ? यांनी अजून कुठे घरफोड्या केल्या आहेत का ? याचा शोध घेत पोलीस पुढील तपास करत आहे.
बॅगा चोरणाऱ्या दुकलीलाही केली अटक
एलसीबीच्या वसई टीमने चार चाकी, टेंपो, ट्रक यामधील बॅगा चोरणाऱ्या दुकलीलाही पकडले आहे. लखन भुतीया (28) आणि निलेश कांबळे (34) असे पकडलेल्या आरोपींची नावे असून यांनी विरार, तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोऱ्या केल्या आहे. दोन्ही आरोपींना तपास करण्यासाठी नालासोपारा पोलिसांना आरोपी देऊन गुन्हा वर्ग केला आहे.