चंद्रपूर : घरात दारूची साठवणूक करून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई सावली तालुक्यातील लोंढोली येथे केली. यावेळी श्रीनिवास रामदास पुल्लूरवार याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्ह्यात अवैध दारूतस्करांविरुद्ध विशेष मोहिम सुरू केली आहे. संचारबंदीच्या काळात परप्रांतातून दारूतस्करी होण्याची शक्यता ओळखून एलसीबीचे विविध पथके जिल्ह्यात गस्त घालत आहेत. सावली तालुक्यातील लोंढोली येथील श्रीनिवास पुल्लूरवार हे घरात दारूची साठवणूक करून ठेवली असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिस हवालदार नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांच्या पथकाने पुल्लूरवार याच्या घरी छापा टाकला. यावेळी घरातून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून श्रीनिवास पुल्लूरवार याला अटक केली. सावली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.