जळगाव : तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याला पहाटे तीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच वेळी त्याला सोबत घेत त्याने जंगलात लपवून ठेवलेला ट्रॅक्टरही शोधून काढत हस्तगत केला. तालुक्यातील सावखेडा गावातून ७ मार्च ते ८ मार्च दरम्यान चोरट्याने ट्रॅक्टर (क्र. एमएच १९, एपी ५०७६) चोरून नेला होता.
या प्रकरणी ११ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ट्रॅक्टरचा शोध घेत असताना तो रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याने चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांनी पहाटे तीन वाजता रमेश सोनवणे याला अटक केली.
जंगलात लपवून ठेवला होता ट्रॅक्टररमेश सोनवणे याने ट्रॅक्टर चोरल्यानंतर तो एरंडोल तालुक्याच्या शेवटी जंगलालगत असलेल्या एका शेतात लपवून ठेवला होता. पहाटे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी त्याला घेऊन पथक पहाटेच जंगलात पोहचले व तेथून दोन लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला आहे.