धाटाव : पालकांनी व्हिडीओ गेम खेळण्यास नकार दिल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलाने घर सोडून छत्तीसगड राज्यातून थेट रायगडमधील रोहा स्थानक गाठले. मात्र, रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो स्वगृही परतला आहे. या अल्पवयीन मुलाला रेल्वे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले असून, पालकांनी त्यांचे आभार मानले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी २० पेक्षा अधिक मुलांना पालकांचा शोध घेऊन ताब्यात दिले आहे. त्यातीलच एक असणारा सचिन संतोष कुमार गुप्ता (१४, रा. चंद्रनगर भलाई, जिल्हा दुर्ग, छत्तीसगड) या अल्पवयीन मुलाने आई-वडील मोबाइलवर व्हिडीओ गेम खेळू देत नाहीत, अभ्यासाचा तगादा लावतात या रागातून क्लासला जात असल्याचे सांगून १० सप्टेंबरला घर सोडले होते.
सायकल घेऊन घरातून निघालेल्या संतोषने सायकल रस्त्यात टाकून थेट रेल्वे स्टेशन गाठले. छत्तीसगडवरून तो महाराष्ट्रात कल्याण स्टेशनला उतरला. तेथून पनवेलला आल्यावर स्टेशनवर कोकणात जाण्यासाठी उभ्या असलेल्या रेल्वेमध्ये बसून प्रवास करत असताना तो रोहा येथे आल्यावर रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी त्याची चौकशी केली. त्याने रागातून घर सोडल्याचे सांगितले. त्यांनी त्याला धीर देत त्याच्याकडून पालकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले.