मुंबई - मृत नौदल अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यातून एटीएमद्वारे साडेदहा लाख रुपये काढण्यात आल्याची तक्रार गोवंडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपास करून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रेहान मेमन (३९) आणि कय्यूब सगीर खान (३९) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
नौदलातील निवृत्त कॅप्टन राल्फ कुटिनो यांचे 4 जूनला गोवंडीतील गंगा सोसायटीतील घरी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून साडेदहा लाख रुपये काढण्यात आल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी बॅंकेत चौकशी केली असता एटीएममधून ही रक्कम काढण्यात आल्याचे समजले. कुटिनो यांच्या भावाने तात्काळ गोवंडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांनी नेहरू नगर परिसरात राहत असलेल्या रेहान मेमन आणि कय्यूब या दोघांना करण्यात आली आहे. रेहानला ३० डिसेंबरला नेहरु नगरमधून अटक केली. न्यायालयाने त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रेहानने दोन साथीदारांच्या मदतीने कुटिनो यांच्या खात्यातील साडेदहा लाख रुपये लंपास केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याच्या अधिक चौकशीत कय्यूबला आज नेहरू नगर परिसरातून अटक करण्यात आली. आज रेहान आणि कय्यूबला न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे, असे गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.
कसे लंपास केले एटीएम कार्ड ?
कॅप्टन राल्फ कुटिनो घरात एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची माहिती एक - दोन दिवसांनी कुटुंबीयांना मिळाली होती. कुटिनो यांचा भाऊ रिचर्ड (६२) हे कुर्ला येथील नेहरू नगर परिसरात राहतात. त्यांना भावाच्या निधनाची माहिती कळाल्यानंतर रिचर्ड यांनी मदतीसाठी रेहान आणि कय्यूबला कुटिनो यांच्या घरी नेले. मृतदेह घरातून बाहेर काढण्यासाठी रेहान मेमन आणि कय्यूब हे दोघे आले होते. त्या वेळी रिचर्ड यांच्या अपरोक्ष तेथे पडलेले एटीएम कार्ड त्याने चोरले आणि नंतर एटीएममधून रक्कम काढली. एटीएमवरील शेवटचे चार अंक हाच पासवर्ड असल्याचे रेहानने पोलीस चौकशीत सांगितले असल्याची माहिती तपास अधिकारी खरात यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.