जयपूर: उन्हाळ्यात सर्वसामान्यांना लिंबाचे दर आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे आता चोरट्यांची वक्रदृष्टी लिंबांवर पडली आहे. राजस्थानच्या जयपूरमधील भाजी मंडईतून लिंबू चोरीला गेले आहेत. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोर भाजी मंडईत घुसून लिंबू चोरी करून फरार होत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.
सोने, चांदी यांच्यानंतर आता लिंबांची चोरी होऊ लागली आहे. जयपूरच्या मुहाना भाजी मंडईतून आता लिंबू चोरीला गेले आहेत. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. त्यामुळे व्यापारी पेचात सापडले आहेत. घरी जाऊन घराची रखवाली करावी की मंडईत बसून लिंबू चोरीला जाऊ नये म्हणून पहारा द्यावा, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची संपूर्ण घटना दिसत आहे. एक व्यक्ती मंडईत शिरतो आणि एक कॅरेट लिंबू उचलून बाहेर घेऊन जातो. मंडईच्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षात लिंबू ठेऊन चोर फरार होतो. गेल्या काही दिवसांपासून जयपूरच्या मंडईतून वारंवार लिंबू चोरीला जात आहेत. याप्रकरणी व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीदेखील दाखल केल्या आहेत.