ठाणे : शून्य व्याज दराने बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून शंभरहून अधिक जणांना सुमारे दीड कोटींचा गंडा घालणाऱ्या दीपक सिंग (३० रा. नालासोपारा), मारु ती शेलार (२८ रा. भांडूप), दीपक गिरी (२१ रा. ठाणे) आणि इमतीयाज कुरेशी (२८ रा. वागळे इस्टेट) या चौघांना शीळ डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच मोबाइलसह काही कागदपत्रेही जप्त केली असून त्यांच्या विविध बँक खात्यातील सुमारे पाच लाख रूपये गोठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.दीपक सिंग या सूत्रधाराने त्याच्या सात ते आठ साथीदारांच्या मदतीने नौपाड्यातील एका कॉल सेंटरमधून फोन करून अनेकांना शून्य व्याजाच्या अमिषावर कर्ज देण्याचे अमिष दाखविले. कर्जासाठी समोरील व्यक्ती तयार झाल्यानंतर त्यांच्याकडून दहा हजार रुपये तर कोणाकडून ५० हजार रुपये ही टोळी वेगवेगळ्या कारणाखाली घेत होती. यास्मीन राजानी (५३) यांनाही त्यांनी शून्य व्याज दराने सहा लाखांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून चार लाख ७५ हजार रुपये उकळले होते. त्याबदल्यात त्यांना कोणतेही कर्ज न देता त्यांची फसवणूक केली.२ जुलै २०१८ रोजी याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जावळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय पाटील यांच्या पथकांनी १९ जुलै रोजी सूत्रधार दीपक सिंग आणि मारुती शेलार या दोघांना तर २० जुलै रोजी इतर दोघांना अटक केली. त्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर २६ ते ३० जुलै दरम्यान चितळसर पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला.आरोपींनी तक्रारदार महिलेशी विजय पाटील, रियाज सिद्धिकी, श्रेया देसाई, रिटा कुलकर्णी अशा वेगवेगळया नावांनी संपर्क करून त्यांच्याकडून कधी फीचे तर कधी जीएसटीच्या नावाखाली पैसे काढले. त्याअनुषगाने पोलिसांनी तपास करून नौपाड्यातील रूक्मिणी इमारतीमधील कॉल सेंटरवर छापा टाकून या चौघांना अटक केली. कागदपत्रे, डायरी, हार्डडिस्कवरून या आरोपींनी सुमारे १०५ हून अधिक गरजूंची दीड कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.अशा प्रकारच्या फसवणुकीप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील चितळसर मानपाडा, कोळशेवाडी, मुंब्रा, विष्णूनगर तसेच मुंबईतील एलटी मार्ग पोलिस ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीणमधील टिटवाळा, पालघर जिल्ह्यातील तुळींज, नवी मुंबईतील तुर्भे, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून अनेकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तक्रारदारांनी शीळ डायघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. यात चौघांना अटक झाली असून उर्वरित चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.अशी झालीइतरांची फसवणूकदीपक आणि त्याच्या साथीदारांनी केवळ फसवणुकीसाठी पाच फोन वापरले. त्याद्वारे ते फक्त गिºहाईकांना जाळ्यात ओढत होते. त्याद्वारे त्यांनी सुमारे १०५ जणांना गंडा घातल्याचे उघड झाले.यात आणखीही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोनची फाइल बँकेतून मंजूर करण्यासाठी वाराणसी येथील सचिन सिंग याच्या खात्यावर सुरुवातीला दहा हजार रुपये भरण्यास सांगितले जायचे.त्यानंतर जीएसटीसाठी ३६ हजार, अन त्यानंतरही इतर कारणांनी हे पैसे उकळले जात होते, असे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
कर्ज देण्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा; डायघर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:46 AM