ठाणे - उत्कृष्ठ आचारी (कूक) असलेल्या जयकिसन पल्लई (47) किसननगर येथे राहणाऱ्या या हॉटेल व्यावसायिकाने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
जयकिसन याचा हायलँड येथे टेलर व्यवसायाचा गाळा आहे. तो भाडयाने दिलेला आहे. अलिकडेच त्याने राबोडीतील आयडीयल शाळेसमोरील मार्केटमध्ये कर्ज काढून स्नॅक्स कॉर्नर हे उपहारगृह 1 जानेवारी 2019 पासून सुरु केले. या हॉटेलला अवघे 20 दिवस झाले होते. हॉटेलही चालत नसल्यामुळे त्याचे बँकेचे हप्ते थकले होते. त्याला हॉटेलसह अन्यही काही कर्ज होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. दरम्यान, आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे आपले स्नॅक्स कॉर्नर उघडले. नोकराला मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी पाठवले. तो सकाळी 7 वाजेपर्यंत परत आला. तोपर्यंत जयकिसन याने हॉटेलच्या पत्र्याला असलेल्या लोखंडी अँगलला पत्नीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी घरातूनच निघताना त्याने सफाईसाठी ही ओढणी घेऊन जात असल्याचे पत्नी सुनिताला सांगितले होते. सुनिता आणि जयकिसन यांना एक 20 वर्षाचा मुलगाही आहे. पती कर्जाच्या विवंचनेत असल्याची माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी दिली. उपनिरीक्षक हर्षलकुमार गावीत हे अधिक तपास करीत आहेत.