कणकवली - बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणातील आरोपींकडून कणकवली पोलिसांनी शिकारीसाठी वापरलेली बंदूक, बिबट्याची १४ नखे, दात तसेच इतर साहित्य जप्त केले आहे.या प्रकरणातील चार आरोपीना त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच याप्रकरणात आणखीन काहीजणांचा समावेश असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
आप्पा हरिश्चंद्र सावंत (३७,रा. भिरवंडे-परतकामवाडी) व मंगेश पांडुरंग सावंत (५४,रा. भिरवंडे-परतकामवाडी) या दोघांनी दोन वर्षापूर्वी बिबट्याची शिकार नाटळ येथील जँगलमय भागात केल्याचे तपासात पुढे येत आहे. ते ठिकाणही त्या आरोपीनी पोलिसांना दाखविले आहे. आप्पा सावंत याच्या घरातून पोलिसांनी शिकारीसाठी वापरलेली बंदूक, चौदा नखे, दोन दात, एक बॅटरी तर मंगेश सावंत यांच्याकडून दोन चाकू, कोयता,फावडे,कुदळ व शिकारीसाठी वापरलेली बॅटरी असे साहित्य जप्त केले आहे.
कणकवली तालुक्यातील तळेरे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्या श्रावण लक्ष्मण माणगावकर, (३७,रा. तळेबाजार,देवगड ) ,राजेंद्र पंढरीनाथ पारकर (६०,रा. वळीवंडे,देवगड ) या दोन संशयिताना ताब्यात घेतले होते. त्या दोघांना पोलिसांनी नंतर अटक केली होती. त्यांच्या चौकशीत याप्रकरणी आणखी चार संशयितांची नावे पुढे आली होती. त्या चौघांना कणकवली पोलिसांच्या पथकाने रविवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यांच्या सखोल चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रविवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली होती.
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या सखोल चौकशीत बिबट्या कातडीचा व्यवहार हा कुंभवडे-गावठणवाडीतील श्रीराम सखाराम सावंत (वय २८) याच्यामार्फत झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यापर्यंत ते संशयित कसे पोहोचले याची चौकशी केली असता कुंभवडे-शाळेवाडीतील संतोष मधुकर मेस्त्री (वय ४३ ) याचे नाव पुढे आले. संतोष मेस्त्री हा यातील संशयित आरोपी राजेंद्र पारकर याच्या संपर्कात होता. रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने संतोष मेस्त्रीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर श्रीराम सावंतलाही ताब्यात घेण्यात आले.
श्रीराम याला बिबट्याची कातडी कुणी दिली? याची विचारणा केली असता आप्पा हरिश्चंद्र सावंत याने दिल्याचे त्याने सांगितले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत मंगेश पांडुरंग सावंत हाही असल्याचे सांगितले.त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. प्रकरणाचा तपास कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस नाईक पांडुरंग पांढरे यांचे पथक करत आहे.