नाशिक: बिबट्याच्या कातडीच्या तस्करीच्या बेतात असलेल्या संशयितांची गोपनीय माहिती काढून वनविभागाच्या इगतपुरी पथकाने सापळा रचला. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जव्हार-मोखाडा रस्त्यावरील आंबोली फाट्यावर सोमवारी (दि.५) दुपारी चार वाजेच्या सुमारास तस्करीचा डाव वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल उधळला. यावेळी तस्करांनी दगडांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. हल्ला थोपविण्यासाठी वनक्षेत्रपाल यांनी हवेत गोळीबार केला. चौघा संशयितांच्या मुसक्या बांधण्यास वन पथकाला यश आले. बिबट्याची संपुर्ण कातडीदेखील जप्त केली.
मोखाड्याच्या काही संशयितांनी बिबट्याच्या कातडीच्या तस्करीसाठी शिकार केल्याची गोपनीय माहिती इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांना याबाबत कळविले. महिनाभरापासून संशयितांचा माग काढत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. कातडीच्या खरेदीसाठी हिंदीभाषिक ग्राहक असल्याचे भासवून बिरारीस यांनी तस्करांशी संपर्क साधला. सुरुवातीला सोमवारी ठरल्यानुसर बिरारीस यांनी गर्ग व पवार यांच्या नेतृत्वाखाली सुक्ष्म पद्धतीने कारवाईचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला.
सुरुवातीला तस्करांनी घोटीमध्ये येण्यास सांगितले. तेथून पुन्हा पत्ता बदलून थेट त्र्यंबकेश्वरजवळ बोलविले. आंबोली फाट्यावर एका शेतात खरेदीचा बनाव बिरारीस व त्यांच्या पथकाने सुरु केला. कातडी ताब्यात घेत रक्कम देत असताना अचानकपणे तस्करांनी दगडांनी पथकावर हल्ला चढविला. यावेळी झालेल्या झटापट व मारहाणीत दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही झटापट रोखून संशयितांना वाहनांत डांबण्यासाठी बिरारीस यांनी स्वत:जवळील पिस्तुलने हवेत दोन फैरी झाडल्या. यानंतर चौघांना ताब्यात घेण्यास पथकाला यश आले आहे. चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---इन्फो--मोखाड्याच्या पाड्यांमधून तस्करी?
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे चाैघे संशयित हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवाशी आहेत. संशयित आरोपी प्रकाश लक्ष्मण राऊत (४३,रा.रांजणपाडा), परशुराम महादु चौधरी (३०,रा.चिंचुतारा), यशवंत हेमा मौळी (३८,रा.कुडवा), हेतु हेमा मौळी (३८) या चौघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. या वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी बिरारीस हे करीत आहेत.